उर्दु घर

महाराष्ट्र राज्यातील उर्दू घरे

महाराष्ट्रामध्ये उर्दू भाषेची वाड:मयीन प्रगती, मराठी व उर्दू भाषेमधील लेखक, कवी, विचारवंत इ. मध्ये सर्जनशील विचारांची देवाणघेवाण होऊन उर्दू भाषेचा वाड:मयीन विकास व्हावा व उर्दू भाषेच्या समृध्दीसाठी उर्दू घराच्या रुपाने एक ठिकाण असावे या उद्देशाने राज्यातील काही उर्दू भाषिक बहुल शहरामध्ये उर्दू घर उभारण्याचे प्रस्तावित आहे.

सद्य:स्थितीत नांदेड, मालेगाव, सोलापूर आणि नागपूर येथे उर्दू घरे उभारण्यात येत आहेत. नांदेड आणि मालेगाव उर्दू घराचे काम पूर्ण झाले असून सोलापूर उर्दू घराचे काम अंतिम टप्प्यात आहे नागपूर उर्दू घराचे काम सुरु आहे. सन 2021-22 मध्ये उर्दू घरासाठी रु.7.00 कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. या उर्दू घरांची कामे लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येत असून त्यांच्या व्यवस्थापनासंदर्भातही धोरण निश्चित करण्यात आले आहे.

या घरांचा वापर, देखभाल, दुरुस्ती तसेच ती सुस्थितीत ठेवण्यासाठी मूळ धोरण दि.21.07.2016 च्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आले होते. आता त्यात काही नवीन मुद्यांची भर घालण्यात आली असून दि.28.06.2021 च्या शासन निर्णयान्वये सविस्तर नियमावली जारी करण्यात आली आहे. तसेच या उर्दू घरांमध्ये आयोजित करावयाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सांस्कृतिक समिती तसेच प्राधिकृत उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सांस्कृतिक उपसमिती स्थापन करण्यात आली आहे.

उर्दू घरांमध्ये वर्षातील अधिकाधिक दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम, विविध भाषेतील पुस्तकांचे प्रकाशन इत्यादी स्वरुपाचे कार्यक्रम होतील. उर्दू घरातील वाचनालय, ग्रंथालयामध्ये उर्दू, मराठी आणि हिंदी भाषेतील वर्तमानपत्रे, उर्दू भाषेतील नियतकालिके, पुस्तके उपलब्ध असतील. नवी दिल्ली येथील नॅशनल काऊन्सिल फॉर प्रमोशन ऑफ उर्दू लँग्वेज संस्थेमार्फत चालविल्या जाणाऱ्या विविध प्रशिक्षण कार्यक्रम, अभ्यासक्रम यांच्या धर्तीवर उर्दू घरांमध्ये प्रशिक्षण, अभ्यासक्रम चालविण्यासाठी काऊन्सिलकडून अनुदान, मार्गदर्शन मिळविण्याचे प्रयत्न केले जातील व त्या अनुदानातून काऊन्सिलमार्फत चालविल्या जाणाऱ्या कार्यक्रमाच्या धर्तीवर उर्दू भाषिक नसलेल्या समुदायाला उर्दू शिकविण्यासाठी उर्दू घरामध्ये वर्ग सुरु करण्याचे प्रयत्न केले जातील.

अल्पसंख्याक विकास विभागामार्फत बांधण्यात येणाऱ्या उर्दू घरांची सद्य:स्थिती खालीलप्रमाणे आहे-

१. नांदेड उर्दु घर :

मदिना नगर, नांदेड येथील तुल उलूम शाळेजवळील सर्वे नं.12692 येथील महानगरपालिकेच्या मालकीच्या भूखंडावर उर्दू घर बांधण्याच्या रु.8,16,00,000/- (रुपये आठ कोटी सोळा लाख मात्र ) इतक्या किंमतीच्या प्रस्तावास दि.4 फेब्रुवारी, 2014 च्या शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. सदर उर्दू घराचे बांधकाम पूर्ण झालेले असून सदर सदर उर्दू घराचा ताबा जिल्हाधिकारी, नांदेड यांच्याकडे देण्यात आला आहे. सदर उर्दू घराचे उद्घाटन दि.14.07.2021 रोजी करण्यात आले आहे. सदर उर्दू घरामध्ये कॉन्फरन्स हॉल, वाचनालय, 2 क्लासरुम, 1 अतिमहत्वाचे कक्ष, 2 पाहुण्यासांठी कक्ष,1 ग्रीन रुम बांधण्यात आलेली आहे. वर नमूद केल्याप्रमाणे सदर उर्दू घरामध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

योजनाविषयीचा शासन निर्णय

छायाचित्रे -

2. मालेगांव उर्दु घर :

मालेगाव शहरातील सर्वे नं.169 मधील उर्दू शाळा क्र.64 च्या जवळील 20,000 चौ.फु.क्षेत्रफळाचा भुखंडावर उर्दू घर बांधण्याचा रु.4.00 कोटी (रुपये चार कोटी मात्र) किंमतीच्या अंदाजपत्रकास शासन निर्णय, अल्पसंख्याक विकास विभाग, क्र.अविवि/2015/ प्र.क्र.55/कार्या-4, दि.21 मे,2015 अन्वये मान्यता प्रदान केली आहे. त्यानुसार सदर उर्दू घरासाठी रु.4.00 कोटी इतके अनुदान ही शासनाकडून वितरित करण्यात आले होते. तद्नंतर सदर उर्दू घराच्या अतिरिक्त कामासाठी मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, नाशिक यांनी प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावाची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून छाननी करुन रु.7,84,15,966.00 (रुपये सात कोटी चौऱ्याऐंशी लाख पंधरा हजार नऊशे सहासष्ट मात्र) किंमतीच्या सुधारित अंदाजपत्रकास दि.23.08.2018 च्या च्या शासन निर्णयान्वये सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. सदर उर्दू घराचे काम पूर्ण झाले असून त्याचा ताबा जिल्हाधिकारी, नाशिक यांच्याकडे देण्यात आलेला आहे.

योजनाविषयीचा शासन निर्णय

छायाचित्रे -

३. सोलापूर उर्दु घर :

सोलापूर शहरातील सर्वे नं.6172 मधील सोलापूर महानगरपालिकेच्या ताब्यातील 2274.22 चौ.मी. भूखंडावर उर्दू घर बांधण्याच्या रु.8,97,19,000/- (रुपये आठ कोटी सत्याण्णव लाख एकोणीस हजार मात्र) इतक्या किंमतीच्या प्रस्तावास मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सचिव समितीच्या दि.21.3.2017 रोजी पार पडलेल्या बैठकीत मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. त्यास अनुसरुन सोलापूर शहरातील सर्वे नं.6172 मधील सोलापूर महानगरपालिकेच्या ताब्यातील 2274.42 चौ.मी भूखंडावर उर्दू घर बांधण्याच्या अंदाजपत्रकास दि.2.5.2017 च्या शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. आतापर्यंत सदर उर्दू घरासाठी रु.6.82 कोटी इतके अनुदान वितरित करण्यात आले आहे. आता सदर उर्दू घराचे काम अंतीम टप्यात आहे.

योजनाविषयीचा शासन निर्णय

4. नागपूर उर्दू घर:

खसरा, क्रमांक 110 व 112, मौजा-इंदोरा, सिध्दार्थनगर, टेका, नागपूर येथील इस्लामिक कल्चरल सेंटरची इमारत “नागपूर उर्दू घर” म्हणून संचालन, व्यवस्थापन व देखभाल-दुरुस्तीसाठी अल्पसंख्याक विकास विभागाकडे हस्तांतरीत करण्याच्या अधिक्षक अभियंता, नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर यांच्या दि.17.7.2017 येथील प्रस्तावास विभागाने दि.21.08.2017 च्या शासन पत्रान्वये सहमती प्रदान केली आहे. सदर उर्दू घर नागपूर सुधार प्रन्यास यांच्याकडून उभारण्यात येत असून अल्पसंख्याक विकास विभागाकडून सदर उर्दू घराचे सनियंत्रण करण्यात येणार आहे. सदर उर्दू घरासाठी रु.50.00 लाख इतके अनुदान वितरित करण्यात आले आहे. सदर उर्दू घराचा ताबा नागपूर सुधार प्रन्यास यांच्याकडून घेण्याबाबत तसेच उर्दू घराची प्रलबित असलेली कामे पूर्ण करणेबाबत जिल्हाधिकारी, नागपूर यांना कळविण्यात आले आहे.